जळगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय फळपिक विमा नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हा कृषि विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविली आहे.
शासनाकडून पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यंदापासून कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी (ऐच्छिक) यांना विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो अपलोड करणे आवश्यक राहील असे म्हटले होते. परंतु सद्य:स्थितीस जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो जोडण्यासंदर्भात साशंकता व्यक्त केली आहे.
या संदर्भात योजनेत सहभागी होऊ इच्छीणा-या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, अर्जदार शेतकरी विमा अर्जासोबत जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय विमा नोंदणी करु शकतात. मात्र शेतकऱ्यांनी याबाबतची पुर्तता पुढील कालावधीत लवकरात लवकर करुन देणे आवश्यक राहील. या संदर्भात विमा कंपनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेला फोटो काढून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.