शायर मुनव्वर राणांविरोधात एफआयआर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । फ्रान्समध्ये घडलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राणा यांनी आपल्या वक्तव्यात फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेला योग्य असं म्हटलं होतं. यावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी धार्मिक भावना भडकवण्याच्या आरोपाखाली मुनव्वर राणा यांच्या विरोधात एफआयरची नोंद केली आहे.

मोहम्मद पैगंबराच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादातून फ्रान्समध्ये रक्तपात घडला होता. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्यानंतर फ्रान्समधील नीस शहरात एका चर्चेमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांने तिघांचा जीव घेतला होता. व्यंगचित्र आणि त्यानंतर झालेल्या हल्ल्याचे जगभर पडसाद उमटत असताना मुनव्वर राणा यांनी हल्ल्याचे समर्थन केलं होतं.

मुनव्वर राणा म्हणाले होते की,”जर धर्म आईसारखाचं आहे, तर कुणी आपल्या आईचं किंवा धर्माचं वाईट व्यंगचित्र काढत असेल. शिव्या देत असेल, रागामध्ये ती व्यक्ती असं करण्यासाठी मजबूर असते. मुस्लिमांना चिडवण्यासाठी असं व्यंगचित्र काढलं गेलं. जगामध्ये हजारो वर्षांपासून ऑनर किलिंग होत आहे. अखलाक प्रकरणात काय झालं?, पण तेव्हा कुणालाही त्रास झाला नाही. कुणालाही इतका त्रास देऊन नका की, तो हत्या करण्यासाठी मजबूर होईल,” असं राणा यांनी सांगितलं होतं.

यावरून पोलिसांनी एफआयआर दाखल करत सांगितले की, हे विधानामुळे समाजामध्ये वैमनस्य निर्माण होऊ शकते. तसेच, यामुळे सामाजिक सलोख्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो व समाजातील शांतता भंग होण्याची देखील शक्यता आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी मुनव्वर राणा विरोधात कलम १५३(ए), २९५ (ए), २९८, ५०५ सह अन्य कलामांतर्गत खटला दाखल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा निषेध करत, भारत या लढाईमध्ये फ्रान्ससोबत उभा असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही मुनव्वर राणा यांनी भाष्य केलं होतं. “राफेलमुळे पंतप्रधानांना असं बोलावं लागत आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.

Protected Content