राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची तयारी आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे.

“मंत्रिमंळासमोर जे प्रेझेन्टेशन झालं त्यामध्ये आरोग्य विभागाच्या सचिवांनी प्राकर्षाने सांगितलं की महाराष्ट्र आणि आपल्या देशात दुसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र ही शक्यता आहे. आपण ज्या अटी-शर्थी घातल्या आहेत, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, मास्क घालणं, हात सॅनिटाइज करणं या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत,” असं टोपे म्हणाले. “

फ्रान्स, स्पेन सध्या युरोपमधील अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. “दिवाळीच्या तोंडावर अनेकजण बाहेर पडताना शॉपिंग करताना दिसत आहेत. मात्र हे करतानाही काळजी घेण्याची सूचना मी जनतेला करेन,”, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्यामधील मंदिरे उघडण्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना टोपे यांनी, “मंदिरं बंद रहावी असं आम्हालाही वाटत नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मंदिरं उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतरच मुख्यमंत्री चर्चा करुन निर्णय घेतील,” अशी माहिती दिली.

संसर्गाच्या कालावधीत राज्यात एका दिवशी सर्वोच्च सुमारे २३ हजार रुग्ण सापडले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात ही संख्या ३६४५ पर्यंत खाली आली होती. मात्र, त्यात पुन्हा वाढ होऊन ऑक्टोबरच्या शेवटी दररोजच्या रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत गेली आहे.

राज्यात २६ ऑक्टोबरला एकाच दिवशी राज्यात ३६४५ रुग्ण आढळले होते. २७ ऑक्टोबरला ५३६३, २८ ऑक्टोबरला ६७८३ तर २९ ऑक्टोबरला ५९०२ रुग्णांची नोंद झाली आहे. ३० ऑक्टोबरला दिवसभरात ६१९० नवीन रुग्ण आढळले. ३१ ऑक्टोबरला ही संख्या ५५४८ एवढी होती. शेवटच्या आठवडय़ात वाढलेली ही संख्या चिंतेची असल्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साथ संपलेली नाही, याचे भान नागरिकांनी ठेवावे अशी सूचना डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा करत आहेत.

Protected Content