शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी अपक्ष आमदारानं काढला भाजप सरकारचा पाठिंबा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कृषी कायद्याला विरोध करत ६ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनानं हरयाणात मनोहर लाल खट्टर सरकारच्या अडचणींत भर पडलीय. दादरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार सोमबीर सांगवान यांनी खट्टर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतलाय.

सांगवाल यांनी सोमवारीच पशुधन विकास बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही सोपवला होता. मंगळवारी त्यांनी सरकारचा पाठिंबाही काढून घेतलाय. मनोहर लाल सरकारसोबत यापुढे आपण काम करू शकत नसल्याचं स्पष्टीकरण सांगवान यांनी दिलंय. शेतकऱ्यांना आंदोलनात पाठिंबा देणार असल्याचं सांगत सांगवान यांनी आपला राजीनामा सरकारकडे धाडलाय.

मंगळवारी सकाळीच अपक्ष आमदार सांगवान यांच्यासोबत काही खाप पंचायती दिल्लीला रवाना झाले. आपल्याला पदाची कोणताही लालसा नसल्याचंही सांगवान यांनी यावेळी म्हटलं. रविवारी रोहतकच्या जाट भवनात ३० हून अधिक खाप पंचायतींच्या बैठकीत ते सहभागी झाले होते. तन, मन आणि धनानं शेतकऱ्यांना आंदोलनासाठी मदत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

यापूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी अगोदरच मनोहर लाल खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय. आता सोमबीर सांगवान यांनीही सत्तेतून काढता पाय घेतल्यानं खट्टर सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Protected Content