शेतकर्‍याला कमी व्याजदराचे आमिष दाखवित दीड लाखाची फसवणूक करणाऱ्यास अटक

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील शेतकर्‍याला कमी व्याजदराचे आमिष दाखवित 1 लाख 59 हजार 701 रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणार्‍या संशयित मजहर अन्सारी जमाल मिया वय 26 रा. अलगचुवा ता . कर्मतांड जि. जामताडा, झारखंड याच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सलग तीन दिवस झारखंडमध्ये मुक्कामी राहून पोलिसांना संशयिताला अटक केली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील धमणगाव येथील नितीन आनंदराव निकम वय 41 यांना 24 जुलै 2019 इंडिया बुल धनी लोन या बँकेतून मॅनेजर बोलत असून आमची बँक ही कमी व्याज दराने लोन देते असा अनोळचा व्यक्तींचा फोन आला. फोनवर बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने निकम यांचा विश्वास संपादन करुन त्यांना 3 लाख रुपये कमी व्याज दराने देण्याचे आमिष दाखविले. व त्यानुसार निकम यांच्या पत्नीचे आधारकार्ड तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एटीएम कार्डचा फोटो व्हॉटस्अ‍ॅपव्दारे मागवून घेतला. यानंतर अनोळखी व्यक्तीने निकम यांना सात दिवस वारंवार संपर्क साधला. तसेच ओटोपी क्रमांक मिळवून निकम यांच्या खात्यातून 1 लाख 59 हजार 701 रुपये ऑनलाईन काढून घेतले. याप्रकरणी 3 ऑगस्ट 2019 रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात आला. तपासात झारखंड येथील संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांनी पोलीस उपनिरिक्षक अंगत नेमाणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण पाटील, पोलीस नाईक दिलीप चिंचोले, ललीत नारखेडे, अरविंद वानखेडे, श्रीकांत चव्हाण, गौरव पाटील यांचे पथक 31 डिसेंबर रोजी झारखंडा राज्यात रवाना केले. पथकाने अंत्यंत अभ्यासपूर्ण पध्दतीने कौशल्यपणा लावून झारखंड मधील अतिदुर्गम भागात असलेल्या जमताडा येथून संशयित मजहर अन्सारी यास सापळा रचून ताब्यात घेतले. पथकाने संशयितांकडून ऑनलाईन फसवणूकीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल, एटीएमकार्ड, पॉस मशीनही हस्तगत केले आहे. त्या ताब्यात घेतल्यावर 1 जानेवारी रोजी पथक जळगावात परतले. संशयित मजहर यास न्यायालयात हजर केले असता त्यास 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content