शेतकरीविरोधी कायद्यांमार्फत जनतेचे अन्न ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न –बाळासाहेब थोरात

 

मुंबई : वृत्तसंस्था । शेतकरीविरोधी कायद्यांमार्फत जनतेचे अन्न ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे”, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर टीका केली.

शेतकऱ्यांना अडचणीत आणून शेतमाल स्वस्तात खरेदी करण्याचे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन होत आहे. या कायद्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात काही शंका आहेत. त्यांच्या मनात भीती आहे ती सरकारने दूर करावी. पण भारतीय जनता पार्टी खोटी माहिती देऊन जनतेची, शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. असेही ते म्हणाले .

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मुंबईतील पुतळ्याजवळ आज आंदोलन केले. यावेळी त्यांना सरकारवर तोफ डागली. ते पुढे म्हणाले, “काँग्रेसची भूमिका ही नेहमीच शेतकरी, सामान्य जनतेला आधार देण्याची आणि त्यांना मदत करण्याची असते. काँग्रेसवर भाजपा करत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, दीडपट हमी भाव देऊ या आश्वासनाचे काय झाले? याचं उत्तर भाजपानेच जनतेला दिलं पाहिजे.”

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधातील भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. “हे कायदे शेतकरी हिताचे नसून मुठभर धनदांडगे, उद्योगपती, साठेबाज यांच्या फायद्याचे आहेत आणि यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे. कोणतीही चर्चा न करता, खासदारांना निलंबित करुन हुकुमशाही पद्धतीने हे कायदे आणले गेले आहेत. या कायद्यांविरोधात देशभर आक्रोश असून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता जनतेचे आंदोलन झाले आहे. कायदे रद्द केल्याशिवाय ते थांबणार नाही”, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Protected Content