शेंदूर्णी, प्रतिनिधी । राज्यात आज ४ ते १७ मे पर्यंत पुन्हा लॉक डाउन वाढविण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात जमावबंदी आदेशही कायम असल्याने सीआरपीसीचे कलम १४४ नुसार ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक खाजगी कार्यक्रमांवर असणारी बंदी यापुढेही कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, लॉक डाऊनच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे.
राज्यात लॉक डाउन १७ मे पर्यंत वाढ करण्यात आली असली तरी राज्य सरकारने २ मे रोजी काढलेल्या नवीन परिपत्रकांनुसार लॉक डाउनमध्ये थोडीशी शिथिलता देण्यात आली आहे. यानुसार शेंदूर्णी नगरपंचायत क्षेत्रात, व्यापारी संकुलातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद राहतील. तसेच पान टपरी, हॉटेल,सलून दुकान, दारूची दुकाने, मॉल्स , सिनेमा थिएटर, इत्यादी वरील बंदी पूर्वीप्रमाणे कायम राहील. वरील व्यवसाय सोडून इतर सर्व व्यवसायांना, आस्थापनांना आज दि. ४ मेपासून दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळात व्यवसाय, आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर पुरविणे तसेच सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.