शेंदुर्णीतील अवैध धंदे थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी । पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेंदुर्णी येथे सुरु असलेल्या अवैध व्यवसायात वाढ झाली असून शहराला अवैध धंद्यापासून मुक्त करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा छावा मराठा युवा महासंघातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनाचा आशय असा की, पहूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शेंदुर्णी पोलिस चौकी हद्दीतील अवैध धंद्यावाल्यांवर पोलीस
प्रशासनाने वारंवार कारवाई करुन सुध्दा काही पोलीसांना हाताशी धरुन व चिरीमिरी करुन पुन्हा शेंदुर्णी गावात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरु झालेला आहे.  सर्वात वाईट गोष्ट म्हणजे गावातील धार्मिक स्थळे, प्राथमिक शाळा परिसर, मुख्य रस्ते यावर  खुलेआम सट्टा बिटींग, सट्टा पिढ्या व एजंट अवैध व्यवसाय राजेरोसपणे करीत आहे. तसेच परिसरातील नदी पात्राच्या बाजूला पत्त्यांचे सद्यस्थितीत आठ ते दहा अड्डे सुरु असून संबंधितांवर प्रतिबंध तसेच  त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे दिसुन येत आहे.  आमच्या अर्जाची लवकरात लवकर दखल घेऊन संबंधित अवैध धंदे करणाऱ्यांवर योग्य ती कडक कारवाई करावी आणि संपूर्ण शेंदुर्णी शहर हे अवैध धंद्यापासून मुक्त करावे अशी छावा मराठा युवा महासंघाद्वारे विनंती करण्यात आली.   संबंधित धंद्येवाल्यांवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, महाराष्ट्र ९९ न्युज मुख्य संपादक प्रकाश आर. पाटील, संतोष महाले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला सोनवणे, महिला आघाडी जिल्हा सदस्य सपना सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content