जळगाव प्रतिनिधी । पत्नीने भावाच्या मदतीने न्यायालयात खावटीची केस टाकल्याचा राग मनात ठेवून मेव्हण्याने शालकाच्या मानेवर विळ्याने वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवाजी नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेव्हण्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील शिवाजी नगर घरकुल पसिरातील रहिवासी मंगेश उर्फ निलेश शांतारामा बिर्हाडे (वय-२७) असे जखमी तरुणाचे नाव असून तो आई वडील बहीण व भाची सोबत वास्तव्यास आहे. मंगेश हा शहरात होर्डींग्ज लावण्याचे काम करुन कुटुंबाला हातभार लावतो. गेल्या चार वर्षांपूर्वी मंगेशच्या बहिणीचे पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील सचिन किसन भगत यांच्यासोबत विवाह झाला होता. परंतु मेव्हण्याकडून आपल्या बहिणीला त्रास देत असल्याने मंगेश हा बहिणीला माहेरी घेवून आला होता. तसेच मंगेशने जिल्हा न्यायालयात खावटीसाठी मेव्हण्याविरुद्ध अर्ज दाखल केला होता. आज दुपारी मंगेश हा घरी पलंगावर झोपलेला असतांना त्याचा मेव्हाण सचिन भगत हा त्याठिकाणी आला. त्याने त्याच्या हातातील विळ्याने झोपेत असलेल्या मंगेशच्या मानेवार वार करण्यास सुरुवात केली.
मानेवर वार होताच मंगेश हा झोपेतून जागा झाला. त्याच्या मानेतून रक्तस्त्राव होत असतांना त्याचा मेव्हणा त्याच्यावर वार करीतच होता. मंगेशने याच अवस्थेत त्याच्या हातातील विळा हिसकवून आपल्या मेव्हण्याला त्याने ढकलून दिले. मंगेशने मेव्हण्याच्या हातातील विळा हिसकवला नसता तर मोठी घटना घडली असती.
मंगेशवर मेव्हण्याने वार केल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मंगेशला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मंगेशच्या मानेवर गंभीर वार असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याप्रकरणी मंगेश बिर्हाडेच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वार करणार्या सचिन भगत यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.