शिवसेनाप्रमुखांच्या राजकीय धोरणाशी विसंगत उद्धव ठाकरे यांची भूमिका ; आमदार पडळकर यांची टीका

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीणार्या विरोधी नेत्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहभागी होणे म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या राजकीय धोरणाशी विसंगत उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे

 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील १२ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाकडे या नेत्यांनी लक्ष वेधलं असून, यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. “खासदार संजय राऊत यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकलं असून, त्याबद्दल तुमचं अभिनंदन,” असं म्हणत पडळकर यांनी काही प्रश्न विचारले आहेत. ‘याचे पण उत्तर देणार का? किंबहूना देणार का?,’ असा टोलाही पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला आहे.

 

एका पत्राद्वारे आपण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली, या बद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन! खासदार संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकत आपण सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

 

ज्या बारा नेत्यांनी हे पत्र दिले आहे, त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याशी हयातभर लालबाग, परळपासून मराठी पट्ट्यात संघर्ष केला आणि मराठी माणसाला आपल्या झेंड्याखाली आणले त्या कम्युनिस्टांचे देशातील दोन बडे नेते डी. राजा आणि सीताराम येचुरी ही आहेत. आपले सर्वेसर्वा मार्गदर्शक अर्थातच शरद पवार आहेत. ज्यांची खिल्ली बाळासाहेबांनी पाकधार्जिणा म्हणून अनेकदा उडविली ते फारुख अब्दुल्लादेखील आहेत. असो , अशी नोंद इतिहासानं तुमच्याबद्दल घेऊ नये म्हणून मी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून तुमच्या असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव तुम्हाला करवून देत आहे.असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे

Protected Content