अहमदनगर : वृत्तसंस्था । शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर लावण्याचा ठराव शिर्डी नगरपंचायतमध्ये मांडण्यात आला आहे. मात्र यावरुन सत्ताधारी भाजप आणि शिवसेना- राष्ट्रवादीत राजकीय कलगीतुरा भलताचं रंगला आहे.
साईबाबा संस्थानने शिर्डी नगरपंचायतला दिला जाणारा स्वच्छता निधी बंद केला आहे. त्यामुळे आता शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा एकदा प्रवेशकर सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी बंद झालेले टोल नाके पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपने हा ठराव मांडला आहे. स्थानिक महाविकास आघाडीचे नेते आगामी निवडणूक समोर ठेवून या ठरावाला विरोध करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केला आहे.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. त्यामुळे शिर्डी नगरपंचायतला गावाच्या स्वच्छतेचा मोठा भार पडत असतो. याआधी साईभक्तांना शिर्डीत येताना प्रवेशकर द्यावा लागत होता. मात्र भक्तांना हा त्रास होऊ नये यासाठी २००५ मध्ये शिर्डी स्वच्छतेसाठी नगरपंचायतला लागणारा निधी साई संस्थानतर्फे देण्याचा निर्णय घेतला. शिर्डी संस्थानचे तात्कालीन अध्यक्ष कै. जयंत ससाणे यांनी हा निर्णय घेतला होता.
तेव्हापासून दर महिन्याला साईसंस्थानकडून नगरपंचायतला ४२ लाख रूपये दिले जात होते. मात्र लाॅकडाऊनच्या काळात गेल्या मे महिन्यापासून साईसंस्थान प्रशासनाने दिला जाणारा निधी अचानक बंद केला गेला. त्यामुळे नगरपंचायतीला स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचं असा प्रश्न निर्माण झाला.
दर महिन्याला स्वच्छता करण्याचा ठेका दिलेल्या कंपनीला पेमेंट करणं अवघड झाले. साईसंस्थानने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक निधी देणं बंद केल्याने आता प्रवेशकर गोळा करण्याचा ठराव नगरपंचायतने केला आहे.
शिर्डी नगरपंचायतवर भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत नगरपंचायतची अडचण दूर करण्यासाठी आता साईभक्तांकडून प्रवेशकर आणि स्वच्छता कर आकारणी सुरू करण्यात येणार आहे. नगरपंचायतने राज्यसरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर कर गोळा करण्यासाठी नाके सुरु होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी हा ठराव मांडला आहे. पण या ठरावाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विरोध केला आहे.
शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी प्रवेश कर वसूलीला कडाडून विरोध केला आहे. मात्र शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी समन्वयाची भूमिका घेतली आहे. तसेच साईबाबा संस्थानने बंद केलला स्वच्छता निधी द्यावा, अन्यथा आंदोलन करू असा पावित्रा घेतला आहे. शिर्डी नगरपंचायतीत अनिता जगताप या एकमेव नगरसेविका आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. जगताप यांच्या वक्तव्याने शिवसेनेत फूट पडल्याच दिसून येतं आहे.
प्रवेशद्वारावर टोलनाके सुरू हो़ऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या नाक्यांना परवानगी देणार का? आणि शिर्डीच्या स्वच्छतेचा तिढा सुटणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. दोन वेळा स्वच्छतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी शिर्डी आगामी काळातही स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.