शिक्षण क्षेत्राची वर्तमानात दुर्दशा; चिंतन करण्याची गरज – डॉ. श्रीपाल सबनीस

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज शिक्षण क्षेत्राची झालेली दुर्दशा पाहता प्राध्यापक संघटनांनी चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. खाजगीकरण करणारी परदेशी विद्यापीठे देशात येत आहेत. देशातील राजकीय धोरणांमुळेही विविध क्षेत्रांमध्ये चिंताजनक परिस्थिती झाली आहे. प्राध्यापकांच्या प्रश्नांवर मागील सहा दशकांच्या काळात झालेला संघर्ष जाणून घेण्यासाठी “सफरनामा” प्रत्येकाने वाचलाच पाहिजे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ख्यातनाम साहित्यिक प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.

येथील शिक्षणसेवक, सेवानिवृत्त प्रा. डॉ. युवराज वाणी यांचे बहूप्रतिक्षित जीवन चरित्र “सफरनामा”चे प्रकाशन रविवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ख्यातनाम साहित्यिक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. प्रसंगी अध्यक्षस्थानी यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आ. शिरीष चौधरी होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, हॉबी क्लबचे अध्यक्ष मजिद जकेरिया, “एन-मुक्टो” प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील, प्रगती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष वसंत चौधरी, सचिव गोवर्धन पाटील यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला भारत माता पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी इशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. प्रस्तावनेतून मुख्याध्यापक रवींद्र माळी यांनी डॉ. युवराज वाणी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन पुस्तकाविषयीची माहिती दिली. त्यानंतर “सफरनामा” पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले.

पुस्तकाचे लेखक डॉ.युवराज वाणी यांनी सांगितले की, पूर्ण आयुष्यात प्रामाणिकपणे केलेले कार्य “सफरनामा” मध्ये वर्ण केलेले आहे. पुस्तकातील अनेक पात्रांनी आयुष्यात खूप शिकवले. “पूक्टो” ते “एन-मुक्टो” प्राध्यापंक संघटनेच्या माध्यमातून विविध विषयांवर केलेला संघर्ष आजही अंगावर काटा आणतो. आज शिक्षण क्षेत्राची झालेली वाताहत मात्र पाहवत नाही, असेही त्यांनी सांगितले. हॉबी क्लबच्या माध्यमातून अनोखा छंद जोपासण्याचे भाग्य मिळाले तर प्रगती शिक्षण मंडळाच्या माध्यमातून गोरगरिब विद्यार्थ्यांची शिक्षणसेवा करता आल्याचेही ते म्हणाले.

यानंतर डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, प्रा. डॉ. युवराज वाणी यांनी ‘एनमुक्टो’, ‘एआय फक्टो’ या संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षे प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांसाठी, मागण्यांसाठी सुरुवातीला पुणे विद्यापीठ आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संघर्ष केला आहे. त्याचबरोबर नशिराबाद येथील शतकी परंपरा असलेले सार्वजनिक वाचनालय, प्रगती शिक्षण मंडळ, जळगावच्या माध्यमातून होतकरू मुलांसाठी शिक्षणसेवा यासह ‘हॉबी क्लब’ च्या माध्यमातून छांदिष्ट जीवन देखील ते जगत आहेत. दुर्मिळ अशी नोटा,नाणी, टपाल तिकिटे त्यांच्या अनमोल संग्रहात आहेत. अशा विविध बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे जीवन चरित्र म्हणजे “सफरनामा” हा खान्देशच्या इतिहासात ऐतिहासिक ठेवा आहे, असेही त्यांनी सांगितले.

माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी, परखड स्वभावाचे डॉ.युवराज वाणी यांनी जीवनभर ध्येयनिष्ठ राहून शिक्षण क्षेत्राची साधना केली, असे सांगितले. तर माजी आ. रमेश चौधरी, प्रा.डॉ.अनिल पाटील, मजीद झकेरीया यांनीही मनोगतातून डॉ.युवराज वाणी यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. शिरीष चौधरी म्हणाले की, जीवनभर व्रतस्थ असणारे डॉ. युवराज वाणी यांनी संघर्षालाच जीवन मानले. शिक्षण व ग्रंथ चळवळीत त्यांचे कार्य अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या “सफरनामा” पुस्तकाला प्रत्येकाने वाचले पाहिजे, असेही आ.चौधरी म्हणाले.

कार्यक्रमाला प्राध्यापक संघटना, प्रगती शिक्षण मंडळ, हॉबी क्लब आदी संघटनांतील प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता निकम, सुवर्णा सोनार यांनी तर आभार निलेश नाईक यांनी मानले. कार्यक्रमासाठी बालनिकेतन विद्यामंदिर, ललिता वाणी माध्यमिक विद्यालय, सर्वोदय विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मान्यवरांच्या हस्ते विद्यालयांचे झाले नामकरण
कार्यक्रमात रामानंद नगर परिसरातील नवीन माध्यमिक विद्यालयाचे ‘ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालय’ असे नामकरण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य के.बी.पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच माजी आमदार रमेश चौधरी यांच्या हस्ते भूषण चौधरी यांनी दिलेल्या निधीतून नर्सरी स्कूलचे “गेंदालाल चौधरी नर्सरी” असे नामकरण करण्यात आले. तसेच २ नविन वर्गखोल्यांचे उदघाटन आ.शिरीष चौधरी यांनी केले. यावेळी विद्यालयाच्या परिसराचे व उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले.

Protected Content