शिक्षकांना शिकविण्याची पध्दत बदलावी लागणार- कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षकांनी आपल्या विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढीला लागावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून शिकविण्याची पध्दत देखील बदलावी लागेल असे प्रतिप्रादन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत उच्च संशोधन उपकरणे हाताळणीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करतांना कुलगुरू बोलत होते. यावेळी मंचावर अकादमीचे समन्वयक सुरेश बाबर, प्रशिक्षणाचे समन्वयक प्रा.ए.एम. महाजन, प्रभारी अधिष्ठाता प्रा.एस.एस. राजपूत, केसीआयएलएलचे संचालक डॉ. राजेश जवळेकर उपस्थित होते. प्रा. माहेश्वरी आपल्या भाषणात म्हणाले की, संशोधनातील विद्यार्थ्यांचा रस कमी होत आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या घटते आहे. तसेच विद्यार्थी कॉलेज व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिक्षणासाठी यायला तयार नाहीत ही आमच्या सर्व शिक्षकांसाठी धोक्याची घंटा आहे. याचे आत्मपरीक्षण सर्व शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये बदल करावा लागेल. आपल्याला काय हवे यापेक्षा विद्यार्थ्यांना काय हवे त्यापध्दतीचे बदल करावे लागतील. शिकविण्याची पध्दत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी रोल मॉडेल व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आताच्या काळात डेटाचे महत्व वाढले आहे. ज्याच्याकडे अधिक डेटा तो अधिक संपन्न व्यक्ती समजले जाते. त्यामुळे संशोधन करतांना डेटा महत्वाचा टरतो असेही ते म्हणाले.

प्रारंभी सुरज बाबर यांनी अकादमीच्या कामाची माहिती दिली. समन्वयक प्रा.ए.एम. महाजन यांनी सहा दिवसाच्या या प्रशिक्षणाविषयी माहिती देवून आंतरविद्याशाखीय अभ्यासाच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातून विविध अध्यापक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. संजय घोष यांनी केले. डॉ. डी.जे. खिराळे यांनी आभार मानले.

Protected Content