शासनाने तात्काळ कापूस खरेदी केंद्र सुरु करावे : उपसभापती फेगडे

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतक-यांचा कापुस अद्यापही घरात पडलेला आहे. या कापसास ना व्यापारी खरेदी करीत आहेत ना शासन. कापूस उत्पादक शेतकरी कोरोनाच्या संकटसमयी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच खरीपाची पेरणी तोंडावर येत असून शासनाने तात्काळ तालुक्यात कापूस खरेदीस प्रांरभ करावा अशी मागणी कृउबा उपसभापती राकेश फेगडे यांनी केली आहे.

यावर्षी खरीपांतर्गत उत्पादित केलेला कापूस अद्यापही शेतक-यांच्या घरात पडून आहे. व्यापारी कमी भावाने खरेदी करीत असल्याने शासकीय पातळीवर कापूस खरेदी केंद्र सुरू होईल या आशेने शेतक-यांनी कापूस व्यापाऱ्यांना दिला नाही. त्यातच कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन झाल्याने शेतक-यांचा कापूस अजूनही घरातच साठवून आहे. मागील चार वर्षापासून तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद आहे. यावर्षी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या वतीने कापूस खरेदी सुरू करावी अशा आशयाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र, राज्य शासनाने त्याकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही. खरेदी केंद्र नाही तर किमान तात्काळ नोंदणी केंद्र तरी सुरू करावे असाही प्रस्तावही शासनाकडे दिला असल्याचे बाजार समीतीचे उपसभापती राकेश फेगउे यांनी सांगीतले आहे.

शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप
या वर्षात अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना संसर्गाचा फटका आणि घरात पडून आलेला कापूस शासनाकडून खरेदी होत नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी संबंधित लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी लक्ष देऊन तालुकास्तरावर कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करावे.अशी शेतक-यांकडून मागणी केली जात आहे.

Protected Content