‘टूलकिट’ प्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ता दिशा रवीला अटक

बंगळुर- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बंगळुरमधून २१ वर्षांच्या क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केली आहे. ४ फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात केस दाखल केली होती. 

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीनंतर दिल्लीत हिंसाचार झाला. त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याबरोबरच इंटरनेट सेवाही बंद केली होती. याप्रकरणी पॉपस्टार सिंगर रिहानाबरोबर पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या ग्रेटा थनबर्गने ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर ग्रेटाने एक टूलकिट ट्विट केली होती. जी नंतर डिलीट करण्यात आली.

टूलकिटसमोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. याच प्रकरणात पोलिसांनी दिशा रवि या तरुणीला ताब्यात घेतलं आहे. बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात ती वास्तव्याला असून, तिथेच पोलिसांनी तिला अटक केलं. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करून आणखी मुद्दे समाविष्ट केल्याचा आणि ती पुढे पाठवल्याचा आरोप आहे.

 

Protected Content