शासनाची फसवणूक प्रकरणी डॉ. तळवलकर व अन्य ८वर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सत्र न्यायालयाने ११ नोव्हेंबर २२ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे ला.ना.हायस्कूलचे माजी क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप तळवलकर व त्यांचे ८ सहकारी यांच्या विरोधात  दि.२१ नोव्हेंबर रात्री गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास पवार हे पुढील तपास करीत आहेत.

 

संघटक तथा विविध क्रीडा संघटनावर कार्यरत असलेले जळगावचे फारूक शेख अब्दुल्ला यांनी दाखल केलेल्या तक्रारीत शासनाची कशाप्रकारे डॉ. प्रदीप तळवलकर व इतरांनी संगनमत करून फसवणूक केली ते कागद पत्रासह नमूद आहे.  यात त्यांनी १६ वेळेला शाळेच्या हजेरी पत्रकावर स्वाक्षरी असताना सुद्धा त्याच कालावधीत जळगाव जिल्हा बाहेर विविध स्पर्धेसाठी पंच, निवड समिती सदस्य व आयोजक म्हणून प्रमाणपत्र मिळवली.सहाय्यक धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्या कार्यालयात नोंदणी कृती ५ क्रीडा संघटना चे इतर बोगस दस्तऐवज सादर केले. २००७ ते २०१३ तलवारबाजीचे १० स्पर्धेतील प्रमाणपत्र, तसेच ४९ प्रमाणपत्रावर डॉ. तळवलकर यांची एकाच वेळी दोन-तीन ठिकाणी उपस्थिती दर्शवून एकच व्यक्ती वेगवेगळ्या तीन स्पर्धेसाठी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र वरून दिसून आले. जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या ३४ प्रमाणपत्रावर ॲथलेटिक्सच्या स्पर्धेत तांत्रिक पंच म्हणून उपस्थित दाखवले. परंतु, त्या अवधीत इतर ठिकाणी सुद्धा उपस्थित असल्याचे दाखविले एवढेच नव्हे तर या ३४ प्रमाणपत्रावर दोन सचिवांच्या वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या असून मूळ सचिवची एकही स्वाक्षरी नाही.  आट्यापाट्या फेडरेशनचे २००४,१० व १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे प्रमाणपत्र मराठी मिश्रित हिंदी भाषेत, स्वस्ताक्षरात लिहिलेले व टाईप केलेले असून त्यावर सुद्धा एकच स्वाक्षरी दिसून येते.

आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल असोसिएशनने २०१०,१२ व १७ सालच्या भारतीय संघाच्या निवडसाठी डॉ. तळवलकर यांची निवड केल्याचे दिसून येते. परंतु, त्या तिघी प्रमाणपत्र हे एकाच हस्ताक्षरात, एकाच स्वाक्षरीने व एकाच फाँड्समध्ये दिसून आले स्वाक्षरी ही सुद्धा मॅच होत नाही.  चर्चा सत्रातील सहभाग, स्पर्धेतील कार्यमुक्तीचे आदेश व आभाराचे एकूण २५ पत्रांचा मजकूर एकसारखा असून हस्ताक्षर सुद्धा एकच आहे व काही प्रमाणपत्रावरील पहिला पॅरेग्राफ व दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये कट अँड पेस्ट मुळे मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते.

क्रीडा महासंघाने २००९ ते २०१३ या पाच वर्षात क्रीडा शिबिर आयोजित केली होती. त्या आयोजनाच्या दिवसात व क्रीडा संघटनाच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरी खाली आमदार हे खोटे असल्याचे दिसून आले.

इतर संघटनांचे, संस्थांचे प्रमाणपत्रावर सचिव म्हणून स्वाक्षऱ्या केलेल्या असल्या तरी जे मूळ सचिव आहेत. त्यांचे त्यांच्या त्या स्वाक्षऱ्या नसून त्यांच्या नावावर इतर बोगस स्वाक्षऱ्या केलेले आहे. एवढेच नव्हे तर क्रीडांगण तयार करणे, व्यायाम शाळा तयार करणे याचे जे प्रमाणपत्र सादर केले आहे ते सुद्धा खोटे व बनावट आहे. तक्रारीत छाननी समितीने डॉ. प्रदीप तळवलकर यांना गुण देताना नियमानुसार तपासणी न करता गुण दिलेले आहे व क्रीडा व युवा सेवा संचालकांना तक्रार देऊन सुद्धा त्यांनी ४ वर्षे चौकशी केली नाही म्हणून त्या क्रीडा व सेवा संचालनालयातल्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी व्हावी.  डॉ. तळवलकर व आठ क्रीडा संघटक यांच्यासह ज्या अज्ञात आरोपींचे हस्ताक्षर, स्वाक्षरी, कॉम्प्युटर प्रिंट काढण्यास केलेली मदत, ज्या ठिकाणी हे  सर्व कागदपत्र तयार करण्यात आले ते कार्यालय, व अज्ञात सर्व आरोपींची चौकशी करून शासनाची फसवणूक केली म्हणून  कायदेशीर फिर्याद दिलेली आहे. यात  एफ आय आर नंबर ६२०/२२ नुसार भादवि १२०ब,४०७, ४२०, ४२७, ४६४, ४६५, ४६९, ४७१ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एफआयआर मधील प्रथमदर्शनी नऊ आरोपी

डॉ. प्रदीप तलवेलकर (माजी क्रीडा शिक्षक लाना हायस्कूल जळगाव) प्रशांत राजाराम जगताप (क्रीडा शिक्षक लाना हायस्कूल जळगाव) आसिफखान अजमल खान (क्रीडा संचालक गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव)प्राध्यापक डॉ. देवदत्त पाटील (क्रीडा संचालक मारवड कॉलेज तालुका अमळनेर) बी. पी. खीवसरा (प्राचार्य धंतोली नागपूर), अशोक दुधारे( निवृत्त क्रीडा शिक्षक,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक नाशिक), डॉ. उदय डोंगरे (क्रीडा संचालक तथा क्रीडा संघटक औरंगाबाद), डॉ. ए. एम. पाटील (प्राचार्य शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर), डॉ. एल. आर. मोर्य ( सचिव सॉफ्टबॉल असो. इंडिया , इंदोर)

 

आरोपींना अटक करून चौकशी करा- फिर्यादीची मागणी

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी  डॉ. प्रदीप तळवलकर यांना त्वरित अटक करून त्यांच्याकडील सर्व मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे जप्त करून चौकशी करावी. तसेच ज्यांनी शासनाची फसवणूक करण्यासाठी डॉ. प्रदीप तळवलकर यांच्यासोबत संगनमत करून खोटे प्रमाणपत्र तयार केलेले आहे त्या सर्वांना अटक करून त्वरित दोषारोपण पत्र सादर करावे अशी विनंती तक्रारदार फारुक शेख यांनी पोलिसांकडे केलेली आहे.

Protected Content