शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचे विद्यार्थ्यांनी घेतले धडे

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोना महामारी कशी थांबवायची, त्याची प्राथमिक लक्षणे काय, त्यावर करावयाची उपाययोजना आणि लसीकरण याबाबत सविस्तर माहिती देणारी कार्यशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना याबाबत कार्यशाळांमधून शास्त्रोक्‍त धडे देण्यात आले.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय,जळगाव येथील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी २७ मार्च रोजी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी अधिष्ठाता तथा कार्यशाळेचे सचिव डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, अधिव्याख्याता डॉ. सागर राणे मंचावर उपस्थित होते.
प्रस्तावनामधून कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती डॉ. किशोर इंगोले यांनी सांगितली. विविध कार्यशाळा विद्यार्थ्‍यांच्‍या अंगभूत कलाकौशल्याना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांनी कार्यशाळामध्ये सहभाग घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे, असे यावेळी डॉ. मारुती पोटे यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. ऐश्वर्या पाटील व डॉ. भाग्यश्री पाटील यांनी तर आभार डॉ. गौरांग चौधरी यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी अभिषेक खंडारे, यज्ञेश कोठावळे, वसुंधरा गीते, निहिरा प्रभू यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दिवसभरात विविध विषयांवर झाले मार्गदर्शन
कार्यशाळेमध्ये विविध विषयांवर तज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. मारुती पोटे यांनी “रुग्णालय परिसरातील महत्त्वाची वैद्यकीय कार्यप्रणाली” याविषयी सविस्तर माहिती सांगितली. तर डॉ. किशोर इंगोले यांनी कोरोनाव्हायरसचा परिचय आणि त्याच्या विविध चाचण्या कशा कराव्यात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
डॉ. विजय गायकवाड यांनी कोरोना महामारीच्या रुग्णाला रुग्णालयात आल्यावर कशा पद्धतीने उपचार पद्धती द्यावी तसेच कोरोना गेल्यानंतर कसे उपचार करावेत याविषयी माहिती दिली. डॉ. योगिता बावस्कर यांनी कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी काम करणारे प्रतिबंधात्मक लसीकरण याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व सांगितले. डॉ. सागर राणे यांनी रुग्णाला सुई टोचताना घ्यावयाची दक्षता याबाबत पीपीटीद्वारे माहिती दिली.

Protected Content