पुणे महानगरपालिकेचे आयुक्त गायकवाड यांची तडकाफडकी बदली

पुणे वृत्तसंस्था । पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची शनिवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. लॉकडाऊन संदर्भात वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आता विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाच महिन्यापूर्वी शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिकेतील आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. पुणे शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी मावळते महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यातील लॉकडाऊन संदर्भात माहिती देताना लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांची अशा प्रकारे तडकाफडकी बदली करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच पुण्यातील आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पीएमआरडीच्या रिक्त झालेल्या जागी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. साखर आयुक्त सौरभ राव यांना विभागीय आयुक्त कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नियुक्त करण्यात आले.

Protected Content