मला चंपा आणि फडणविसांना टरबूज म्हटलेले चालते का : चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे । टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, राजकारणात येण्यापूर्वी ते मला मोठे नेते वाटायचे. मात्र प्रत्यक्षात ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. पवार साहेबांबाबत बोलण्याएवढी आपली किंमत आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.

तर यासोबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेतला होता. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये. तुम्ही निखारा टाकलात तर आम्ही वणवा पेटवू, असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला होता.

याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल चंद्रकात पाटील यांनी केला आहे. अगदी अजित पवार यांनी देखील आपल्याला जाहीरपणे चंपा म्हटले असल्याकडे पाटील यांनी याप्रसंगी लक्ष वेधून घेतले.

Protected Content