नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाइट हाउस प्रोजेक्टचे उद्घाटन केले. या योजनेमुळे शहरी भागांमध्ये नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारच्या लाईट हाऊस प्रोजेक्टसाठी त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड आणि गुजरात या राज्यांची निवड करण्यात आली आहे. हा केंद्रीय शहर मंत्रालयाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिक जलवायू आणि पर्यावरणाचे संरक्षण करून पक्की घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. घरांसाठीचे बीम कॉलम आणि पॅनल कारखान्यातून थेट घर बांधायच्या ठिकाणी आणले जातील. त्यामुळे घरबांधणीसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी कपात होईल. ही घरे भूकंपरोधी असतील. लाइट हाउस प्रोजेक्ट देशातील घरबांधणी क्षेत्राला नवी दिशा दाखवणारे ठरतील. या प्रकल्पातंर्गत नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घरे तयार करण्यात येतील. ही घरे मजबूत आणि गरिबांसाठी आरामदायी असतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.