दहिवद येथे गाव ‘पाणीदार’ कऱण्यासाठी अबालवृद्ध एकवटले

WhatsApp Image 2019 04 29 at 3.46.00 PM

अमळनेर (प्रतिनिधी ) दहिवद या गावाने पाणी फौन्डेशन अंतर्गत वाटर कप २०१९ यांत भाग घेतलेला आहे. दहिवद विकास मंचाच्या सदस्यांनी सक्रीय सहभाग घेत श्रमदान व आर्थिक निधी गोळा करण्याचा विडा उचलला आहे. गावांतील सेनेत असलेल्या सैनिकांनी ,शिक्षकांनी,ग्रामसेवकांनी , दहिवद गावाचे सटाणा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले , नगर येथे कार्यरत असलेले जिल्हानियोजन अधिकारी निलेश भदाणे , मुंबई येथे झी २४ तास येथे कार्यरत असलेले जयवंत पाटील , देश विदेशात असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी देखिल आर्थिक योगदान देत स्पर्धेत प्राण ओतला आहे.

 

सकाळ व संध्याकाळ या दोन टप्प्यात श्रमदानात
सरपंच सुषमा वासुदेव देसले या स्वतः पहिल्या दिवसापासून श्रमदानासाठी हजर आहेत. सरपंच सुषमा देसले व उपसरपंच वैशाली माळी हे स्वतः दिवसा गांवात ग्रामपंचायत सदस्यांना घेवून साफसफाई करत आहेत. पानी फौंडेशनच्या प्रशिक्षणाला गेलेले युवती व युवक मार्गदर्शन करत आहेत. युवा व सामाजिक कार्यकर्ते वृक्ष मित्र पंकज पाटील यांच्या पुढाकाराने संपुर्ण गांव पेटून उठले आहे. ८ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपासून श्रमदानाला सुरवात झाली असून दररोज रात्री शेकडो महिला व पुरुष श्रमदान करत आहेत. सकाळी व संध्याकाळी दोन टप्प्यात युवक श्रमदानात योगदान देत आहेत. आतापर्यंत गावाने वृक्ष लागवड ,सांडपाणी व्यवस्थापन , माती परीक्षण , जलबचतीचे काम , आगपेटी मुक्त शिवार , गँयबियन बांध , पिचिंग ,जुन्या रचनांची दुरुस्ती , वाटर बजेट, सलग समतल चर, १०० मीटर लांबीच्या व ३० मीटर रुंदीच्या गावतलावातून दीड मीटर खोलीकरण श्रमदानाच्या माध्यमातून केले आहे. तसेच अद्यापही श्रमदानातून खोलीकरण चालूच आहे. मारवड विकास मंचामार्फत मिळालेल्या जेसीबीच्या माध्यमातून यंत्राचे काम सुरु झाले असून २०० मीटर लांबीचे खोलीकरण यंत्राच्या सहाय्याने केले जात आहे. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे २२० शक्तीचे पोकलेन उपलब्ध करून देणार आहेत.
तालुक्यात नेहमी चर्चेत असलेले दहिवद गांव वाटर कप स्पर्धेत मात्र प्रसिद्धी पासूनदूर रहात असल्याचे दिसून येत आहे. कामांवर लक्ष केंद्रित करून गांव कसे पाणीदार करता येईल याकडे त्यांचे लक्ष लागून आहे. स्पर्धेकडे स्पर्धा म्हणून न पाहता गांव दुष्काळ मुक्त कसे होईल यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत. गावांतील कामानिमित्त बाहेर गेलेले व गावाबद्दल आस्था व प्रेम असलेल्या सर्व गावकऱ्यांना सोबत घेवून गांव पाणीदार करण्यासाठी संपुर्ण गावाने कंबर कसली आहे . या स्पर्धअंतर्गत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोडविण्यात दहिवद गांव मग्न झालेले आहे. तांत्रिक काम गोकुळ माळी , प्रवीण गुलाबराव माळी, शिवाजी पारधी हे पाहत आहेत. तर जनजागृतीचे काम पोलीस पाटील प्रतिभा पाटील करत आहेत. आता पर्यंत गावांत चार वेळेस प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली आहे. गावात जलजागृतीची प्रभात फेरी काढून गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे . गावात स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे श्रमदानासाठी येणारे बाळ गोपाल तसेच गावातील टीनू -भटू दिवसभर गवंडी काम करतात. या दोघा भावांनी देखील गाव पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेऊन ८ तारखेपासुन दररोज रात्री दोन तास श्रमदान करत आहेत, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गांवातील अपंग अबाल वृद्ध देखिल श्रमदानाला हजेरी लावत आहेत. सरपंच सुषमा देसले यांनी या कामांसाठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्याच बरोबर नाशिक येथे रहात असलेले गावचे सुपुत्र राजेंद्र पांडुरंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २१००० हजारांचे योगदान त्यांच्या प्रियजणांनी केले . पुण्यात रहात असलेले हर्षल माळी यांनी स्वतः तर योगदान दिलेच पण त्याचबरोबर त्यांच्या मित्र परिवाराकडून देखिल ते गावासाठी मदत मागत आहेत. राजेंद्र रुपचंद भदाणे ,दिलीपराव नथू पाटील , रविंद्र भाईदास देसले , ज्ञानेश्वरराजे देसले , सुनिल शालिग्राम पाटील, धर्मवीर भदाणे विदेशात असलेले मनोज पाटील यांनी मोठे आर्थिक योगदान दिले आहे. तालुक्यात सर्वात वादग्रस्त म्हणून ज्या दहिवद गावाची ओळख आहे असे गांव पाण्यासाठी एकत्र येत दुष्काळाशी दोन हात करायला सज्ज झालेले आहे.

Add Comment

Protected Content