संतापजनक : भरपावसाळ्यातही धरणगावात १८ दिवसापासून पाणीपुरवठा नाही

30f0846b 389e 48fe 8f6c 963d5038e748

 

धरणगाव (प्रतिनिधी) संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यातही दमदार पाऊस झालेला असतांनाही धरणगावात मागील १८ दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नाही. फक्त प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे धरणागावकर पाणी टंचाईला सामोरे जाताय. विशेष म्हणजे धरणगाव तालुक्यात ७० टक्के पाऊस झाला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव शहरात मागील १८ दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे महिलांना भरपावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. शहरात एकूण दीडशे झोन असून प्रत्येक झोनला प्रत्येकी दोन तास या प्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. काही दिवसापूर्वीपर्यंत धरणगावात १२ दिवसानंतर पाणी सोडले जात होते. परंतू फिल्टर प्लान्टमध्ये बिघाड झाल्यामुळे यावेळी १८ दिवसानंतर पाणीपुरवठा झाला.

 

या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आता फिल्टर दुरुस्ती झालीय. प्रत्येक झोनच्या पाणी पुरवठ्याची वेळ दोन तासाहून कमी करून लवकरात लवकर शहरातील प्रत्येक भागात पाणीपुरवठा केला जाईल. दरम्यान, या संदर्भात पाणीपुरवठा सभापती यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

 

दरम्यान, भर पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे धरणगावकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. विशेष म्हणजे गावातील एकही राजकीय पक्ष यावर बोलत नाहीय. पालिकेतील विरोधीपक्ष भाजपाचे नगरसेवक शांत आहेत. तर कधीकाळी पालिकेत वर्चस्व राखणारी राष्ट्रवादी देखील गप्प आहे. त्यामुळे सर्वसामान्य धरणगावकरांच्या समस्येला कोण वाचा फोडेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Protected Content