पाळधी येथील तरूणीचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह स्वीकारण्यास आप्तांचा नकार ! (व्हिडिओ)

शेअर करा !

 

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । येथील एका तरूणीने गावातीलच तरूणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळीने तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी करत आरोपींना अटक होईल तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे.

याबाबत वृत्त असे की, पाळधी, ता. धरणगाव येथील आरती विजय भोसले ( वय १९) ही तरूणी ६ डिसेंबर २०२० पासून बेपत्ता झाली होती. दत्त जयंतीच्या दिवशी ती पाळधी गावातीलच प्रशांत पाटील या तरूणासोबत विवाह करून परतली. तिने प्रशांत सोबत प्रेम विवाह केला होता.

दरम्यान, या घटनेला दोन दिवस होत नाही तोच आज सकाळी आरतीच्या आईला काही तरूणांनी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यानुसार त्यांनी सायलीच्या सासरी जाऊन पाहणी केली असता तिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. सासरच्या मंडळीने घातपात करून तिला मारून टाकल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.

आरती विजय भोसले हिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात आणला आहे. मात्र जोवर आरोपींना अटक होत नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा तिच्या माहेरच्यांनी घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!