Home क्राईम जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बायपास रोडवर आज सकाळी धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांनी फोनद्वारे जळगाव बायपास रोडवर एका ट्रकला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. ट्रकमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा निघत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.

आग आटोक्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि बायपास रोडवरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

आग विझविण्याच्या मोहिमेत मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्यासह वाहन चालक दीपक चौधरी आणि गोविंद माळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच फायरमन भूषण पाटील, विजय पाटील, किरण पाटील, सुमित साळवे, संजय तायडे, नितीन ससाने, विकी सोनवणे आणि संदीप कोळी यांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

 


Protected Content

Play sound