Home क्राईम पाचोरा पोलिसांची धडक कारवाई ; दिवसा ढवळ्या जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद

पाचोरा पोलिसांची धडक कारवाई ; दिवसा ढवळ्या जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद

0
11


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात दिवसा ढवळ्या घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना पाचोरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत जेरबंद केले आहे. खोटी पार्सल डिलिव्हरीची बतावणी करून घरात प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवत चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला असून, चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली नकली पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या जबरी चोरीचा उलगडा केला. दि. २२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजेच्या सुमारास सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथील रहिवासी आणि सध्या शक्तीधामच्या पाठीमागील लक्ष्मी आंगण कॉलनी, पाचोरा येथे राहणाऱ्या सौ. कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२, व्यवसाय शेती) यांच्या घरी ही घटना घडली होती. आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर आणि त्याच्या साथीदारांनी अमेझॉनचे पार्सल आल्याचे खोटे सांगून घरात जबरदस्तीने प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी महिला, त्यांच्या दोन मुली आणि मुलाला खाटेवर बसवून ठेवले. त्यानंतर “तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या चिपा लवकर काढून द्या, अन्यथा तुमचे काही खरे नाही,” अशी धमकी देत बंदुकीचा धाक दाखवला. यावेळी आरोपींनी घरातील कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करून कपाटात ठेवलेले सात हजार रुपये तसेच मुलाच्या गल्ल्यातील सातशे रुपये असा एकूण ७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता.

या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याला अटक केली. तपासादरम्यान आरोपी चेतन भुतेकर याच्याकडून त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) (वय ३७, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याचा सहभाग निष्पन्न झाला. तसेच या गुन्ह्यातील अन्य आरोपी योगेश परशराम शिंदे (वय ३१, व्यवसाय खासगी नोकरी, रा. प्लॉट नं. ४९/५०, दर्शन कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. १८, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) याने चोरीचा मुद्देमाल ७ हजार ७०० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली नकली खेळण्यातील पिस्तूल पोलिसांच्या ताब्यात दिली.

पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी गोकुळ वाघ याला फिर्यादी यांच्या पाचोरा येथील घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती मिळाली होती. त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने ही माहिती नितीन पाटील (रा. पाचोरा) याला दिली. त्यानंतर नितीन पाटील याने आपल्या परिचयातील दोन व्यक्तींना बोलावून घेत आरोपी चेतन भुतेकर याच्यासोबत संगनमत करून दिवसा जबरी चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा बापूसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सफौ विलास पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, हरीश परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी आणि नितीन भालेराव यांनी कामगिरी बजावली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहेत. पाचोरा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे दिवसा घडलेल्या जबरी चोरीचा उलगडा झाला असून नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound