Home Cities जळगाव जळगाव पोलीस दलात मोठा फेरबदल! १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव पोलीस दलात मोठा फेरबदल! १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
14


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, काही अधिकाऱ्यांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे तर काहींना विनंतीवरून मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाला प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. एका ठिकाणचा सामान्य पदावधी पूर्ण झाल्याने, जनहितार्थ, प्रशासकीय कारणास्तव तसेच कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखण्यासाठी या बदल्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयसवाल यांची रावेर पोलीस ठाणे प्रभारी पदावरून शनिपेठ पोलीस ठाणे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर धांडोबा साळवे यांची जळगाव शहर पोलीस ठाण्यातून रामानंदनगर पोलीस ठाणे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ मच्छिद्र भिसे यांना त्यांच्या विनंतीवरून सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार यांची वरणगाव पोलीस ठाण्यातून पाचोरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक विकास दादाजी शिरोळे यांना विनंतीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील यांची रावेर पोलीस ठाण्यातून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन हबीब सैय्यद यांची फैजपूर पोलीस ठाण्यातून यावल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक कुणाल प्रमोद चव्हाण यांची चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय भगवान काशिनाथ शिरसाठ यांची चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात, भरत हरिभाऊ दाते यांची चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पूजा संजीवनी अंधारे यांना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, प्रिया रमेश दातीर यांना शनिपेठ पोलीस ठाण्यात विनंतीवरून एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची प्रत संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, विविध शाखा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस दलातील या प्रशासकीय बदल्यांमुळे विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजात नवीन जबाबदाऱ्या निश्चित झाल्या असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

 


Protected Content

Play sound