व्हॅलेंटाईन डे च्या नांवाखाली होणारे अपप्रकार थांबवा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्युज अय्युब पटेल । १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ‘प्रेम दिवस’ म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नका आणि लैंगिक अत्याचारांपासून स्वतःच्या पाल्यांना वाचवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केले आहे. समितीच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार तसेच पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की, समिती या दृष्टीने शाळा-महाविद्यालयांत व्याख्याने देणे, पत्रकांचे वितरण करणे, शासनाकडे निवेदन देणे, सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसार करणे आदींद्वारे जागृती करत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आपण पाश्‍चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करत आहोत. हिंदूंचे सण हे नैतिकता आणि सदाचार शिकवतात. आपली समृद्ध संस्कृती सोडून अन्य धर्मातील प्रथा-परंपरांचे पालन करणे, हे एकप्रकारे आपले मानसिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या धर्मांतरच नव्हे का ? यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ची कुप्रथा रोखा अन् हिंदु संस्कृतीनुसार आचरण करा’, असे आवाहन तरूणांना समितीने केले आहे. या मागणीचे निवेदन प्रशासन सोबतच यावल कला व वाणिज्य महाविद्यालयात तसेच तालुक्यातील काही शाळांत ही देण्यात आले. या वेळी समितीचे चेतन भोईटे, पियुष भोईटे, मयूर महाजन, सौ. नीलिमा नेवे, सौ. छाया भोळे, कु. चैताली गाजरे, कु. पायल नेवे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

Protected Content