जामनेर येथे विविध मागण्यांसाठी बस कर्मचाऱ्यांचे उपोषण; प्रवाश्यांचे हाल

जामनेर भानूदास चव्हाण । बस कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज बुधवार २७ ऑक्टोबर रोजी बेमुदत संप पुकारला आहे.  बसस्थानकासमोर उपोषण सुरू केले आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा बस कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.

बस  कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे, शासनात एसटीचे विलीनीकरण झाले पाहिजे, वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्के वरून ३ टक्के करण्यात यावे, महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या २८ टक्के प्रमाणे मिळावा, घरभाडे राज्य शासनाप्रमाणे देण्यात यावे, कामगार कराराप्रमाणे सर्व कामगारांना नियमित वेतन मिळावे, दिवाळी बोनस १५ हजार रूपये मिळाला पाहिजे, सण उचल १२ हजार ५०० मिळाले पाहिजे अशा प्रकारे विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी व बस कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जामनेर बस कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संप पुकारला असून बसस्थानकासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. आज सकाळपासून सर्व एसटी बसेस बंद असल्यामुळे मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांना येड्या जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे शासनाने तात्काळ बस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करून निर्णय द्यावा, अशी मागणी होत आहे. या संपला जामनेर एसटी डेपो मधील सर्व पुरुष व महिला कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content