मराठा आरक्षणावर संभाजीराजेंची शरद पवारांशी चर्चा

 

मुंबई : वृत्तसंस्था । खासदार छत्रपती संभाजीराजे गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांना भेटले मराठा आरक्षणावर संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटं चर्चा झाली.

 

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. मराठा आरक्षणावरुन भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असून नेमकी परिस्थिती समजून घेणार आहोत, राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

 

“तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना यावेळी केली,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

 

“मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे असं मी शरद पवारांना सांगितलं असून त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशीही चर्चा होणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद होईल,” असं संभाजीराजेंनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलही सांगितलं असून त्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज नाही यावरही शऱद पवारांशी चर्चा झाली असल्याचं ते म्हणाले.

 

Protected Content