मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना अनुभवानंतर आता व्याधीनिहाय अधिकाधिक आरोग्यविमा पॉलिसींची गरज असल्याचे मत इरडाचे अध्यक्ष सुभाष खुंतिया यांनी व्यक्त केले आहे. मधुमेह, ह्रदयरोग व किडनीविकार अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित विमा परिषदेत खुंतिया बोलत होते. व्याधीनिहाय पॉलिसी बाजारात आल्यास त्याचा लाभ नागरिकांना घेता येईल. विशेषतः मधुमेह, ह्रदयरोग व किडनीविकार अशा आजारांसाठी विशेषकरून पॉलिसी बाजारात येणे आवश्यक आहे. विशिष्ट आजारांसाठी आरोग्यविमा पॉलिसी उपलब्ध करून देऊन विमा कंपन्यांना या पॉलिसींना वैद्यकीय तज्ज्ञांची जोड देता येईल, पॉलिसीधारकाला या आजारांची योग्य माहिती देऊन पॉलिसी घेण्यासाठी उद्युक्त करता येईल, असेही खुंतिया यांनी सांगितले.
खुंतिया म्हणाले, विमा क्षेत्राने रुग्णालय भरतीसारख्या तृतीय स्तराच्या सेवेवर इतकी वर्षे लक्ष केंद्रित केले आहे. आता काळानुसार प्राथमिक व द्वितीय स्तरावरील गरजांकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. यामध्ये आऊटपेशंट केअर आणि प्रतिबंधात्मक उपचार यांचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कर्करोग किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस यासारख्या गंभीर आजारांमुळे व्यक्तीच्या रोजगार क्षमतेवरही विपरित परिणाम होतो. तुम्हाला मिळणारी नुकसान भरपाई किंवा हॉस्पिटलचा खर्च मिळाल्याने तुमचा उपचारांचा खर्च भागेलही. मात्र, उत्पन्न क्षमतेलाही संरक्षण देणाऱ्या क्रिटिकल इलनेस पॉलिसीचे संरक्षण तुमच्या आरोग्य विम्यामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. दीर्घकाळच्या जीवघेण्या/गंभीर आजारांच्या बाबतीत क्रिटिकल इलनेस पॉलिसी तुमचा आर्थिक संरक्षक म्हणून काम करते. आजाराचे निदान झाल्यास पॉलिसीधारकाला विम्याची रक्कम एकरकमी मिळेल अशा तरतुदीसोबत अशा आजारांची विशिष्ट यादी यात असते. काही पॉलिसींमध्ये क्लेम करण्याआधी आवश्यक सर्व्हायवल पिरियड असतो.
कोरोनामुळे उद्योग संकटात सापडले असताना विमा उद्योगाला मात्र चांगले दिवस आले आहेत. स्वतःवर काही वाईट प्रसंग आल्यास कुटुंबीयांना आर्थिक साह्य मिळावे या हेतूने अधिकाधिक लोक विमा घेत आहेत. त्यातही टर्म विमा पॉलिसी काढण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण पॉलिसीबझार डॉट कॉम या ऑनलाइन विमा देणाऱ्या कंपनीने नोंदवले आहे.विविध प्रकारच्या टर्म विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी ५० टक्के ग्राहकांनी एप्रिल ते ऑगस्ट या काळात एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा टर्म विमा उतरवला आहे.