व्यवसायिकाला मारहाण करणाऱ्या संशयितास अटक

जळगाव प्रतिनिधी । पाईप खरेदीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून तरुणाने व्यवसायिकाला मारहाण करून त्याच्या खिश्यातील २७ हजार रुपये व मोबाईल लुटून नेल्याची घटना दि.१५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चित्रा चौकाजवळ घडली होती. शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीसांनी मारहाण करणार्‍या संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल येथील अतुल गजानन जगताप हे व्यवसायिक असून त्यांचे न्यू माऊली ट्रेडर्स नावाने दुकान आहे. काही दिवसांपूर्वी जगताप यांची अयोध्यानगरातील जयदीप उर्फ जयवीर गजेंद्रसिंग पाटील यांच्याशी ओळख झाली. दरम्यान जयवीर पाटील याने शेतीसाठी लागणारे पाईप विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्यानुसार दि.१४ रोजी जयवीर याने अतुल जगताप यांना १ लाख २७ हजार रुपयांचे पाईप दिले होते. त्याबदल्यात जगताप यांनी १ लाख रुपये रोख जयवीर याला दिले होते. जगताप हे एरंडोल येथे माल घेवून गेल्यानंतर त्यांना सदर पाईप कमी किंमतीचे असल्याचे समजून आले. त्यानंतर जगताप यांनी जयवीर याला विचारणा केली असता, दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. या वादातून जयवीर याने अतुल जगताप यांच्या कानशीलात मारल्यानंतर ते बेशुध्द पडले होते. दरम्यान अतुल याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या जबाबात त्याने खिश्यातील २७ हजार रुपये व मोबाईल जयवीर पाटील याने लुटून नेल्याचे सांगितले होते. याप्रकरणी शहर पोलीसात अतुल जगताप याच्या फिर्यादीवरून जयवीर गजेंद्रसिंग पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाधिकारी सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, भरत पाटील, विजय निकुंभ, रतनहरी गिते यांनी संशयित जयवीर याला त्याच्या घरून अटक केली.

Protected Content