नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सव्वाशे कोटी भारतीयांच्या डेटावर फक्त दोन व्यक्तींचंच वर्चस्व असेल टाटा समूह सुपर अॅप आणण्याच्या तयारीत आहे, जे चीनच्या वी चॅटसारखंच असेल, टाटा सन्स सुपर अॅपसाठी वॉलमार्टसोबत भागीदारी करणार आहे. वॉलमार्ट टाटा सन्समध्ये २५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
टाटा या सुपर अॅपच्या माध्यमातून फॅशन, लाइफस्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, किराणा, विमा, वित्तीय सेवा यांसारखे व्यवसाय एकाच छताखाली आणण्याच्या तयारीत आहे.या सुपर अॅपमध्ये डिजिटल कंटेंट आणि शैक्षणिक कंटेंटही उपलब्ध असेल.
मुकेश अंबानी आणि टाटा समूह आपापल्या पद्धतीने व्यवसाय धोरण आखत आहेत. मुकेश अंबानी यांना जिओच्या ४० कोटी ग्राहकांचा फायदा होईल. रिलायन्सची रिटेल चैन भारतात सर्वात मोठी आहे. रिलायन्सचे जवळपास १२ हजार स्टोअर्स आहेत. रतन टाटा यांच्या टाटा समुहाचे १०० पेक्षा जास्त प्रकारचे व्यवसाय आहेत. चहापत्तीपासून कारपर्यंतचा व्यवसाय टाटाकडे आहे. प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी असणं ही टाटांसाठी जमेची बाजू आहे.
टाटाची साखळी मोठी आहे. त्यामुळे आपले सर्व व्यवसाय एकाच ठिकाणी विक्री करू शकतील असं पोर्टल टाटाने विकसित केल्यास त्याचा आवाका मोठ्या प्रमाणात वाढेल. वॉलमार्टसोबत करार झाल्यास टाटाला फ्लिपकार्टचं बळ मिळेल. वॉलमार्टने १६ अब्ज डॉलर्समध्ये फ्लिपकार्टचं अधिग्रहण केलं होतं.
टाटा आणि अंबानी यांच्यात रिटेल वॉर लागणार असा अंदाज असला तरी जिओचे ४० कोटी युझर्स ही रिलायन्ससाठी मोठी ताकद आहे. दुसरीकडे टाटा सध्या दूरसंचार क्षेत्रातून बाहेर झाली आहे. एअर इंडिया आणि एअर एशियाची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही. हवाई क्षेत्रात ताकद कायम ठेवायची असेल तर कधी काळी आपलीच कंपनी असलेल्या एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी टाटाला मोठी किंमत मोजावी लागेल. टाटा समुहावर सध्या २० अब्ज डॉलर्स म्हणजेच १.५ लाख कोटींचं कर्ज आहे. रिलायन्स कर्जमुक्त झाली आहे