वैद्यकीय अभ्यासक्रमाच्याही परीक्षा पुढे ढकलल्या

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.

 

१९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. यानंतर अमित देशमुख यांनी ७२ तासांत यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करून परिक्षांसंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ असं ते म्हणाले होते.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ट्विट करत वैद्यकीय परीक्षांचा मुद्दा मांडत चिंता व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी अमित देशमुख यांना योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली होती.

 

 

“राज्यभरात कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. या परिस्थितीत दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत आहेत. परंतु सुमारे ४५० विद्यार्थी व तेवढेच पालक कोरोनाग्रस्त आहेत. अभ्यासाची साधने विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध नाहीत. जवळपास ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. हे लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आपणास विनंती आहे की, कृपया या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन परीक्षांबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा.” असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Protected Content