कोल्हापूर : वृत्तसंस्था । पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, वीजतज्ञ प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेवून दरमहा ३०० युनिट्सच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची सप्टेंबरपर्यंत सहा महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करणेबाबत व त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले.
टाळेबंदी काळातील वीजबिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही अनेक आंदोलने करण्यात आली. शासनाने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता नाही. यामुळे आज राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज कोल्हापुरात ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये भाजपा वगळता जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना, जनता दल सेक्युलर, आम आदमी पार्टी व अन्य विविध पक्ष व इतर सर्वपक्षीय संघटना, उद्योजक सहभागी झाले होते.
“बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नका. सर्वसामान्य वीज ग्रहाकाना दिलासा द्यावा. वीज बिल माफ करेपर्यंत गप्प बसणार नाही. जबरदस्ती वीजबिल वसूल कराल तर आम्ही कायदा हातात घेवू,” असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.