जळगाव प्रतिनिधी । आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या विविध न्याय मागण्यांसाठी ३ जुलैपासून असहकार आंदोलन झेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७० हजार स्वयंसेविका व ३५०० गट प्रवर्तक आहेत. गेल्या दहा वर्षांपासून नागरी व आरोग्य सेवा घराघरात पोहचवत आहेत. जवळपास ७५ पेक्षाही विविध प्रकारची कामे ते करीत असतात. गट प्रवर्तकांना८२०० रुपये प्रवास भत्ता दिला जात असतो.तर आशा स्वयंसेविका यांना कामानुसार भत्ता दिला जातो. यांच्या कामाचा विचार करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन , भत्ता लागू करावा अशी मूळ मागणी आहे. न्याय्य मागणीसाठी २०१९ ला ही संपूर्ण राज्यात आंदोलन केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे , अशाही परिस्थितीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक जीव धोक्यात घालून अग्रभागी राहून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असतात. राज्यात अनेक आशा स्वयंसेवकांचा मृत्यूही ओढवला आहे. यामुळे प्रचंड चीड निर्माण झाली आहे. तसेच प्रचंड असंतोष पसरला आहे. मयत आशांच्या वारसांना तातडीने विमा रक्कम अदा करण्यात यावी , तसेच भरीव मोबदला व प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी संघटनेची रास्त मागणी आहे. ३ जुलै रोजी सर्वांनी या असहकार आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे रामकृष्ण पाटील , माया परमेश्वर , युवराज बैसाने आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे .