विरोधकांच्या गोंधळाचे निमित्त ; कारवाईसाठी नायडूंच्या घरी बैठक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कृषि विषयक दोन विधेयकांवरून राज्यसभेत रविवारी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांना आणि उपसभापतींना विरोध करताना विरोधी पक्षाचे काही खासदार सभागृहाच्या मध्यापर्यंत येऊन पोहचले. कोरोना संक्रमणाचा धोका विसरत विरोधक धक्काबुक्कीवर पोहचले. गोंधळ इतका वाढला की मार्शल्सलाही हस्तक्षेप करावा लागला. विरोधी सदस्यांनी विधेयकाच्या प्रतीचे तुकडे तुकडे करत हवेत भिरकावले. इतकंच नाही तर त्यांनी उपसभापतींच्या समोर लावण्यात आलेले माईकही तोडले. या गोंधळाची राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गंभीरतेनं नोंद घेतलीय.

या गोंधळानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडून खूप चिंतेत असल्याचं समजतंय. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांविरोधात ते कडक कारवाई करण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांकडून सांगितलं जातंय.

त्यामुळेच उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या घरी तातडीनं एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांचाही समावेश आहे. बैठकीत विरोधी खासदारांच्या वर्तनावर चर्चा सुरू असल्याचं समजतंय. कृषि विधेयकांचा विरोध करताना विरोधकांकडून ज्यापद्धतीनं वर्तन करण्यात आलं आणि राज्यसभेचं कामकाज रोखण्याचा प्रयत्न आला त्यामुळे सत्ताधारी भाजपही नाराज आहे.

विरोधी पक्षाकडून राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय. रविवारी राज्यसभेचं कामकाज सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत चालणार होतं. परंतु, कृषि विधेयक संमत करून घेण्यासाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या या एकतर्फी निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप व्यक्त केला. परंतु, विरोधी पक्षाच्या खासदारांचा विरोध डावलून गोंधळाच्या वातावरणातच उपसभापतींनी आवाजी मतदानाद्वारे कृषि विधेयके मंजूर केली.

Protected Content