बापाने मुलाला पाच लाखात विकले

कोल्हापूर: वृत्तसंस्था । लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानंतर अडचणीत सापडलेल्या बापाने मुलाला दत्तक दिल्याचे सांगत चक्क ५ लाख रूपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. मुलाच्या आजीने जावयाचे हे बिंग फोडल्यानंतर सध्या मुलाचा ताबा द्यायचा कोणाला यावरून वाद सुरू झाला आहे. सोमवारी बालकल्याण समिती निर्णय घेणार आहे.

पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील दिगंबर पाटील कोल्हापुरात राहतो. तो चांदी कारागीर आहे. लॉकडाऊनच्या काळात तो बेरोजगार झाला. त्याची पत्नी गेली तीन वर्षे आजारी आहे. त्याला दोन मुले आहेत. आजारी पत्नीचा खर्च आणि मुलांना सांभाळणे अवघड होऊ लागल्याने त्याने पत्नी आणि एका मुलासह माहेरी पाठवले. त्यानंतर तो आणि दहा वर्षाचा मुलगा गंगावेश येथे राहू लागले. या काळात त्याला दारूचे व्यसन लागले. तो कर्जबाजारीही झाला. एका मुलालाही सांभाळणे अशक्य झाल्याने शेवटी त्याने या मुलाला दत्तक देण्याचा निर्णय घेतला.

उत्तम याने साळोखेनगर येथील गजेंद्र गुंजाळ या तृतीयपंथीयाशी संपर्क साधला. आपल्या मुलाला त्याने त्या तृतीयपंथीयास नोटरीद्वारे दत्तक दिले. हा कार्यक्रम मे महिन्यात झाला. जावयाजवळ नातू नसल्याचे लक्षात आल्यानंतर आजीने त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. . शेवटी आजीने कोल्हापुरातील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने या मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा मुलगा एका तृतीयपंथीयाकडे असल्याचे समजले. त्यानुसार ती पोलिसांच्या मदतीने त्या तृतीयपंथीपर्यंत पोहोचली. माझ्या नातवाला परत द्या अशी मागणी केली, तेव्हा यासाठी मी पाच लाख रुपये मोजले आहेत, ती रक्कम परत द्या आणि नातू घेऊन जा असे त्या तृतीयपंथीयाने सांगितले.

आपल्या जावयाने नातवाला पाच लाख रूपयास विकल्याचा आरोप आजीने पोलिसांकडे केला. पोलिसांनी उत्तम आणि गुंजाळ याला मुलासह बोलावून घेतले. यावेळी मुलाने मात्र मी वडिलांकडे राहणार नाही, मी गुंजाळ यांच्याकडेच राहणार असे सांगत आजीकडे जाण्यासही नकार दिला. यामुळे या मुलाचे काय करायचे असा प्रश्न पोलिसांना पडला. शेवटी त्या मुलास येथील बालकल्याण संकुलात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी बाल कल्याण समिती याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.
======

Protected Content