मुंबई : वृत्तसंस्था । ‘लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी विधिमंडळ अधिवेशन किमान ४ आठवडे व्हायलाच हवं. सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केला, तर प्रश्नांपासून पळ काढण्यासाठीच सरकारचा हा प्रयत्न असेल, हे त्यातून स्पष्ट होईल’, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपतं घेण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, संजय राठोड आणि पूजा चव्हाण प्रकरणावरून विचारणा केली असता ‘पोलिसांवर सरकारचा दबाव असल्यामुळे तपास व्यवस्थित होत नाही’, असा आक्षेप त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी फडणवीसांनी राज्यातल्या वीजबिलांच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं. ‘लोकसभेचं अधिवेशन कोरोनाच्या काळात व्यवस्थित चालतं. आपलं आणि त्यांचं अधिवेशन एकाच वेळी आहे. अधिवेशनातून लोकांचे प्रश्न मांडले जात असतात. वीजबिलांच्या बाबतीत समस्या आहेत. ७५ लाख लोकांना नोटिसा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर वीज कनेक्शन कापलेलं कधीही पाहिलेलं नाही. सभागृहच घेतलं नाही, तर हे मांडायचं कुठे? त्यामुळे पूर्ण ४ आठवड्यांचं अधिवेशन घ्यायला हवं. कालावधी जर कमी केला, तर त्याचा स्पष्ट संकेत तोच आहे की वादाच्या मुद्द्यांमुळे प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी हे होत असल्याचं दिसेल’, असं ते म्हणाले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याच्या टीकेचा फडणवीसांनी यावेळी पुनरुच्चार केला. ‘सरकार राठोड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचा पोलिसांवर पूर्ण दबाव आहे. समोर आलेले पुरावे अशा प्रकरणांमध्ये मिळत नाहीत. या प्रकरणात तर पोलिसांकडे आयतेच पुरावे आहेत. पण कारवाई शून्य आहे. पोलीस सरकारच्या दबावाखाली काहीच करत नाहीयेय. इथे नो वन किल्ड जेसिका सिनेमासारखी परिस्थिती दिसते आहे’, असं ते म्हणाले