विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड

मुंबई वृत्तसंस्था । विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची एकमतानं निवड करण्यात आली. यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबचा प्रस्ताव मांडला होता. मात्र उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपा आमदारांनी सभात्याग केला.

निवडणुकीपूर्वी भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, याबाबतचा निकाल गुरूवारी न्यायालय देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. तसंच या ठिकाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं. तसंच यानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं आणि नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली.

“न्यायालयानं आपल्याला बोलावलं नाही. न्यायालयानं निकालाबद्दल सांगितलं नाही. म्हणून हे मान्य करता येणार नाही. निवडणुकीचा प्रश्न नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. उच्च न्यायालयानं समन्स दिलं तर त्यावर आपण उत्तर देऊ,” असं सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यावेळी म्हणाले.

भाजपाकडून विधानपरिषदेचे सदस्य भाई गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. सध्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. परंतु या अधिवेशनादरम्यान अनेक सदस्य अनुपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रविण पोटे या परिषदेच्या सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीची घाई का केली जात आहे? असा सवाल दरेकर यांनी केला. भाजपानं विधिमंडळात याबाबत नेत्यांची बैठक बोलावली होती. तसंच याबाबत उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलम गोऱ्हे यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content