जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने “शेतकरी सहायता उपक्रम” राबविण्यात येणार असून शेतक-यांना या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन केले जाणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी संलग्नित सर्व महाविद्यालयांकडून तसेच शेतकरी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून शेतकरी सहायता उपक्रम राबविण्यात येणार आहे. खान्देशातील बहूतांश जनजीवन हे शेतीशी निगडीत आहे तसेच इथले सांस्कृतिक जीवन शेती-मातीशी जोडलेले आहे. कृषीसंस्कृतीनिष्ठ प्रदेशातील तरूण पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यापीठ कटीबध्द आहे मात्र त्यासोबतच मुलांना उच्च शिक्षणात आणण्यासाठी कष्ट उपासणा-या त्यांच्या शेतकरी आई-वडीलांच्या जीवन विकासासाठी देखील विद्यापीठाने या उपक्रमामार्फत पाऊल टाकले आहे. या उपक्रमांतर्गत शेतक-यांसाठी तंत्रज्ञान साक्षरता कार्यशाळा, विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, शेतीशी निगडीत व शेतीपूरक उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण शेतक-यांसाठी पारंपारिक ज्ञानाचे जतन व हस्तांतरण संवर्धन कार्यशाळा आणि शेतकरी कुटूंबासाठी समुपदेशन कार्यशाळा आदी कार्यक्रम आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत राबविले जाणार आहेत. हे उपक्रम राबविण्यास इच्छूक असणा-या महाविद्यालयांनी तसेच शेतक-यांच्या विविध सहकारी संस्था, सोसायट्या, संघ, कृषि उत्पन्न बाजार समित्या आदींनी आपले प्रस्ताव या विभागाकडे पाठवावेत. त्यासाठी प्रस्तावाचा विहीत नमुना पाठविण्यात आला आहे. प्राप्त प्रस्तावाना यथोचित मान्यता घेवून कार्यक्रमांचे आयोजन करण्यास परवानगी दिली जाईल. अशी माहिती या विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी दिली. या संदर्भात इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.