अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचालकासह पाच जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चिंचोली गावाच्या पुढे जळगाव संभाजीनगर रोडवर अज्ञात वाहनाने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकासह पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ येथे येथे राजेंद्र सुकलाल बारी हे वास्तव्यास आहेत. ते रिक्षाचालक असून प्रवासी वाहतूक करुन ते रिक्षा चालवितात. राजेंद्र बारी हे रविवार, ९ जुलै रोजी त्यांच्या एम.एच.१९ सी डब्लू ५०८० या क्रमाकांच्या रिक्षातून त्यांचे कुटुंबिय तसेच नातेवाईकांना घेवून जळगाव छत्रपती संभाजीनगर रोडने जात होते. यादरम्यान चिंचोली गावाजवळ रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली, या धडकेत रिक्षा रस्त्याच्या खाली उतरली. या अपघातात चालक राजेंद्र सुकलाल बारी, त्यांची पत्नी प्रतिभा राजेंद्र बारी, भाचजवाई विनोद सुरेश वराडे, सपना विनोद वराडे व भाचा जितेश विनोद वराड हे जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत राजेंद्र बारी यांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी साडेतीन वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात वाहनाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी हे करीत आहेत.

Protected Content