विद्यापीठात स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवच्या पार्श्वभूमीवर काढली शोभायात्रा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९ डिसेंबर पासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर सुरु आहे. या शिबिरात सहभागी राष्ट्रीय सेवा योजनेच्या  स्वयंसेवकांची शोभायात्रा आणि त्यानंतर प्रत्यक्ष सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधले होते.

 

धार्मिक सलोखा, एकात्मता, भारतीय संविधान, वारकरी संप्रदाय, विज्ञान तंत्रज्ञानात झालेली प्रगती, पर्यावरण, मतदान जागृती अशा अनेक विषयांची हाताळणी करणारे देखावे, नृत्य, पोस्टर्स इत्यादींचे सादरीकरण करीत युवा पिढी या संदर्भात सजग असल्याचा प्रत्यय सोमवारी विद्यापीठात काढण्यात आलेल्या शोभायात्रेद्वारे देत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सोमवारची सकाळ प्रसन्न केली.  सोमवारी या शिबिरातील रा.से.यो. स्वयंसेवकांची शोभायात्रा आणि त्यानंतर प्रत्यक्ष सादरीकरण झाले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी हिरवी झेंडी दाखवून या शोभायात्रेला प्रारंभ केला. यावेळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, निरीक्षक डॉ. प्रमोद पाब्रेकर, प्राचार्य संजय चाकणे, आनंता बाभुळकर,रासेयो संचालक प्रा. सचिन नांद्रे, समन्वयक प्रा. किशोर पवार, शोभायात्रेचे प्रमुख डॉ. सत्यजित साळवे तसेच सर्व संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गेल्या आठवडाभरापासून गिरवणाऱ्या या स्वयंसेवकांना शोभायात्रेसाठी ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ ही थिम देण्यात आली होती. सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात विविध वेशभुषेत हे स्वयंसेवक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमले आणि विविध घोषणांनी परिसर दमदमून गेला. जिजाऊ, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी आदी महापुरूषांच्या वेषात काही स्वयंसेवक सहभागी झाले. नृत्य, वारकरी, भजन, पथनाट्य यांचा आधार घेत आपला आशय ते पोहचवत होते. पर्यावरण, वनसंपदा, भारतीय संविधान, भारत जोडो, जाती निर्मूलन, वारकरी संप्रदाय, विज्ञान, शेतकरी जीवन, आदिवासींची संस्कृती, व्यसनमुक्ती आदी विविध विषयांवरील फलके, सजीव देखावे सादर करतांना देशाच्या स्वातंत्र्याचे अचूक आकलन या पिढीला झाले असल्याचा प्रत्यय येत होता. अत्यंत शांततेत व शिस्तीत ही शोभायात्रा निघाली. महाराष्ट्राच्या लोकपंरपरेला देखील यावेळी अभिवादन करण्यात आले.

Protected Content