भीषण अपघातात दोन जण जागीच ठार; तिसरा गंभीर जखमी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या गॅसच्या कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत चालक आणि डॉक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.

मयतामध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल देविदास सौपुरे (वय ३३ वर्ष, रा. गोंधळवाडा, पारोळा ) आणि डॉ. निलेश भीमराव मंगळे (वय ३४ वर्ष रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा समावेश आहे. तर संदीप आनंदा पवार (वय ३५ वर्ष, रा, राणी लक्ष्मीबाई नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील कुणाल सौपुरे, डॉ. निलेश मंगळे व संदीप पवार हे तिघेही मित्र आहेत. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने कुणाल सौपुरे यांच्यासह त्यांचे दोघेही मित्र (एमएच ४३ एएल ४१७५) या क्रमांकाच्या कारने मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर विचखेडा गावाजवळ त्यांच्या कारला भरधाव असलेल्या (एमएच ३१ एफसी ४३९३) या क्रमांकाच्या गॅस कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत कार चालक कुणाल सौपूरे व त्यांच्या शेजारी बसलेले डॉ निलेश मंगळे यांचा कारमध्ये दबल्या जाऊन जागेच मृत्यू झाला तर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले संदीप पवार हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर रस्ता लागत उभा करून चालक पसार झाला होता.

जखमीतील तिघांना रुग्णवाहिकेने तिघांना पारोळा शहरातील कुटिर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुणाल सौपुरे व डॉक्टर निलेश मंगळे या दोघांना मयत घोषित केले. तर संदीप पवार यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघात प्रकरणी सुनील वसंत बारी यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल सौपूरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, व दोन वर्षाची लहान मुलगी आहे. ते पारोळा नगरपालिकेत अभियंता होते. त्यांचा सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव होता. डॉ निलेश मंगळे हे उत्तराखंड येथे एम एस ऑर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याची जुळी मुलं आहेत. एकाच घटनेत दोन मित्रांचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने पारोळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content