विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने  कुमार साहित्य संमेलनाचे सोमवार दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. सहाव्यांदा या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

 

विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने बालसाहित्य चळवळीला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन सातत्याने करण्यात येत असून यावर्षी सहाव्यांदा या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.  या वर्षीचे साहित्य संमेलन हे ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या संकल्पनेवर आधारित आहे. या साहित्य संमेलनात विविध साहित्य प्रकार अर्थात काव्यवाचन, कथाकथन, अभिवाचन, प्रकट मुलाखत इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. यासोबतच ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास अशा विविधतेने नटलेल्या साहित्य संमेलनाचे आयोजन सोमवार दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी करीत आहोत. सदर संमेलनातील सादरीकरण उत्कृष्ट व्हावे या हेतूने सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी निवड फेरी घेण्यात येणार आहे.

प्रति वर्षी कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची निवड देखील विद्यार्थ्यांमधूनच केली जाते. या संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी साहित्य क्षेत्रातील रुची या दृष्टीने लेखन, संशोधन, प्रकाशन तसेच कथाकथन, काव्य लेखन इ. विषयात सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या आधारावर तज्ज्ञ परीक्षकांमार्फत संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते.

संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रिया सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होईल.  तसेच संमेलनात सहभागी होण्यासाठी नियमावली ठरविण्यात आली असून याच निवड फेरीदरम्यान सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात येईल. तरी अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण परिचय, स्वरचित कथा, कवितासंग्रह यापूर्वी सहभागी कार्यक्रम, स्पर्धा, वृत्तपत्रातील बातम्या, सहभाग प्रमाणपत्र इ. माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शिफारस पत्रासह मुलाखतीस येतांना सोबत आणावी निवड फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण दि. ९ जानेवारी २०२३ रोजी आयोजित ‘स्वातंत्र्यता साहित्य संमेलनात’ होईल. तरी संमेलनात विविध शाळेतील विद्यार्थी व साहित्य क्षेत्रात रुची असलेल्या शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने आपण सर्वांना  करण्यात येत आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ९७६६९८१७३, ७७९८४०६५१५, ९७६३४०३१२७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Protected Content