विद्यापीठात सोमवारपासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर यशस्वी होईल आणि या माध्यमातून आपल्या विद्यापीठाचा स्वतंत्र पॅटर्न निर्माण होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

विद्यापीठात १९ ते २८ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या चान्सलर ब्रिगेड राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या विविध समिती सदस्यांशी बुधवारी कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी संवाद साधला. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, समन्वयक प्रा. किशोर पवार उपस्थित होते.

प्रा. माहेश्वरी म्हणाले की, राज्यपाल कार्यालयाकडून यापूर्वी राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेची संधी आपल्या विद्यापीठाला प्राप्त झाली होती. आठ वर्षानंतर आता राज्यस्तरीय आव्हान शिबिराच्या निमित्ताने ही संधी मिळाली असून अत्यंत उत्तम आयोजन करून आपल्या विद्यापीठाचा स्वतंत्र पॅटर्न निर्माण करूयात. राज्यातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी यात सहभागी होत असल्यामुळे हे शिबीर यशस्वी झाल्यानंतर विद्यापीठाची प्रतिमा उंचावणार आहे. त्यामुळे सर्वांनी सामुहिकपणे शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा. एस.टी. इंगळे यांनी देखील हे शिबीर यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किशोर पवार यांनी आभार मानले.

Protected Content