एरंडोल शहरात पकडली ५१ ग्राहकांची वीजचोरी

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरात महावितरणने राबविलेल्या धडक मोहिमेत ५१ जण वीजचोरी करताना आढळून आले. गेल्या आठवड्यात कासोद्यात २५ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली होती. महावितरणच्या कारवाईने वीजचोरांत खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (१३ डिसेंबर) एरंडोल येथील पाताळनगरी व मुजावर वाडा या भागात वीज चोरी पकडण्याची धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये २ रोहित्रावरील फ्यूज दररोज जात असलेल्या भागातील एकूण १५१ घरगुती वीज कनेक्शन चेक करण्यात आले. या मध्ये ५१ मीटरमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले व ते मीटर टेस्टिंगसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. मीटरमध्ये वीजचोरी आढळल्यास वीजचोरीचे देयक सदर ग्राहकांना अदा करण्यात येतील व सदर वीजबिल न भरल्यास त्या ग्राहकांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येतील. सदर मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता प्रशांत महाजन, राहुल पाटील, जयदीपसिंग पाटील, युवराज तायडे, लक्ष्मी माने व एरंडोल शहर कक्षाचे सर्व जनमित्र सहभागी यांनी राबविली. दरम्यान, महावितरणची वीजचोरीविरोधातील हि धडक मोहीम सुरूच राहणार आहे, असे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी कळविले आहे.

Protected Content