जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन ॲण्ड लिंकेजेसचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील बँका व उद्योग संघटना यांच्या सहकार्याने नवउद्योजकांना स्टार्ट अप साठी बळ दिले जावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली.
विद्यापीठात गुरुवार २८ जुलै रोजी सायंकाळी बँका व उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत श्री.राऊत बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे होते. इनक्युबेशन सेंटरचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असून अनेक तरुणांकडे नवीन उद्योग सुरु करण्याच्या नवीन कल्पना असतात मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. जिल्हा प्रशासनाकडून उद्योगासाठी पैसे दिले जातात. मात्र योग्य मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे इनक्युबेशन सेंटर, बँका आणि उद्योजक संघटना यांनी एकत्र येऊन जिल्ह्यात स्टार्ट अप वाढीला लागतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खानदेशात उद्योगासाठी मोठा वाव आहे असे श्री.राऊत म्हणाले. प्रा.एस.टी.इंगळे यांनी नवीन स्टार्ट अप साठी या केंद्राच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
या बैठकीसाठी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अरुण प्रकाश, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आर.आर. डोंगरे, बँकेचे प्रतिनिधी प्रितीकुमारी, ईश्वर काळे, निवृत्ती पाटील, प्रियंका झोपे, लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर अग्रवाल, सतीष बियाणी, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबादचे अभियंता वैभव सुर्यवंशी व किरण जाधव, स्टार्ट अप्स प्रतिनिधी डॉ.वासुदेव झांबरे, अर्चना महाजन, रुद्राणी देवरे, कांतीलाल पाटील, अमोल महाजन, सुनील महाजन, विद्यानंद अहिरे, एकनाथ कोटी, आदी उपस्थित होते. प्रारंभी केसीआयआयएल चे संचालक डॉ.विकास गिते यांनी केंद्राची सविस्तर माहिती दिली. व्यवस्थापक निखील कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.