जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्राच्यावतीने २२ नवीन उद्योजकीय कल्पना निवडण्यात आल्या असून या स्टार्टॲप सुरू करणाऱ्या ३२ नवउद्योजकांसाठी तीन दिवशीय कार्यशाळा दि. ५ ते ७ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते.
या कार्यशाळेत प्रमुख पाहूणे म्हणून मार्गदर्शन करतांना भालचंद्र पाटील म्हणाले की, नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रामाणिकपणा, वचनबध्दता या गुणांसोबतच आपल्या उत्पादनाची गुणवत्ता उत्तम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी एसके फॉर्म्यूलेशनचे संचालक सचिन जोशी यांची ही यावेळी उपस्थिती होती. श्री. भालचंद्र पाटील यांनी आपल्या जीवनाचा संपुर्ण प्रवास या कार्यशाळेत मांडला. प्रामाणिकपणामुळे यश प्राप्त झाले हाच प्रामाणिकपणा नवउद्योजकांनी कायम ठेवावा. अडचणी आल्या तरी यातून मार्ग निघत असतो. स्वत:वर विश्वास ठेवा. संघर्ष हा शब्द काढून टाका अशा काही टिप्स त्यांनी दिल्या. सचिन जोशी यांनी आपल्या भाषणात इतरांचा सल्ला घेण्यापेक्षा स्वत:च्या ज्ञानाचा वापर करून स्वत:ला जे वाटते ते करा. उद्योगात यशस्वी होण्यासाठी वेळेचा सन्मान करा. केवळ पैसा हे एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवू नका असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी ज्ञान व माहिती, आनंद व खात्री आणि नाते व कनेक्शन याबाबत तरूण पीढी संभ्रमित आहे असे सांगून हा फरक समजून घ्यावा व त्यातून परिस्थितीशी लढण्याची तयारी ठेवावी. नवउद्योजक होत असतांना कल्पना, ज्ञान आणि सृजनशीलता याचे पैश्यात रूंपातर करा. त्यातून रोजगार निर्माण करणारे व्हा असा सल्ला प्रा. माहेश्वरी यांनी दिला. प्रारंभी संचालक डॉ. राजेश जवळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विकास गीते यांनी इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्राची माहिती दिली तर समन्वयक डॉ. भूषण चौधरी यांनी तीन दिवशाच्या या कार्यशाळेत नवउद्योजकांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे याची माहिती दिली. सागर पाटील यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.