जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुनाखेडी रोड वरील हेरंब सुपरशॉपी दुकानासमोरून शतपावली करत असताना पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत दुचाकीवर आलेल्या चोरट्याने धूमस्टाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी २५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. या संदर्भात रविवारी २६ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नंदा विकास कोळी वय ३७, रा.दशरथ नगर, जळगाव या महिला शनिवारी २५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जेवणानंतर शतपावली करण्यासाठी पायी निघाल्या होत्या. त्यावेळी जुना खेडी रोडवरील हेरंब सुपर शॉपी दुकानासमोर जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या अनोळखी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी हिसकावली आणि दुचाकीवरून पसार झाला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने शनिपेठ पोलिसात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार रविवारी २६ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.