झाले कन्फर्म : शरद पवारांची पारोळा, मुक्ताईनगर व धरणगावात सभा !

मुक्ताईनगर/धरणगाव/पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे संस्थापक शरद पवार हे जळगाव जिल्ह्यात येणार असल्याचे निश्‍चीत झाले असून त्यांची पारोळा, मुक्ताईनगर आणि धरणगावात सभा होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभरात दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. यानुसार, ते लवकरच आपला राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. याच दौर्‍याच्या अंतर्गत ते जळगाव जिल्ह्यात येणार असल्याचे कालच निश्‍चीत झाले होते. या दौर्‍यात दोन सभांचे स्थळ मात्र ठरले नव्हते. आज यावर शिक्कामोर्तब झाले असून शरद पवार हे ९ आणि १० जुलै रोजी पारोळा, मुक्ताईनगर आणि धरणगाव या दोन ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती आज विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

हे देखील वाचा : शरद पवार जळगाव जिल्ह्यातून फुंकणार रणशिंग !

शरद पवार हे ९ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या दिवशी सायंकाळी सहा वाजता त्यांची सभा पारोळा येथे होणार आहे. यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे १० जुलै रोजी दुपारी दोन वाजता तालुका क्रिडा संकुलाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज सकाळपासूनच या मैदानावर साफसफाईचे काम सुरू झाले आहे.

राष्ट्रवादीचे संघटन सरचिटणीस डॉ सुनिल नेवे, बाजार समिती माजी सभापती निवृत्ती पाटील, माजी पं. स. सभापती विलास धायडे, राष्ट्रवादी मुक्ताईनगर शहराध्यक्ष राजेंद्र माळी, भुसावळचे माजी नगरसेवक बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे,नगरसेवक शकील सर, प्रविण पाटील, एजाज खान,प्रशांत भालशंकर,योगेश चौधरी,चेतन राजपूत,विजय शिरोळे,पांडुरंग नाफडे,रजाक मुलतानी, अजय अढायके आदींच्या उपस्थितीत सभेच्या ठिकाणी तयारीस प्रारंभ करण्यात आला आहे. मुक्ताईनगरात शरद पवार साहेब यांची सभा होणार असून याला विराट जनसागर उपस्थित राहील अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या दौर्‍यात त्याच दिवशी म्हणजे १० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता धरणगावातील इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या मैदानावर देखील शरद पवार यांची सभा होणार आहे. येथे देखील आजपासून सभा स्थळाची पाहणी करण्यासह अन्य कामांना स्थानक पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ करण्यात आला आहे. तर पारोळा येथे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या पदाधिकार्‍यांनी सभेची तयारी सुरू केली आहे.

शरद पवार यांचा आगामी दौरा आणि त्यांच्या तीन सभांबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

Protected Content